महावितरणचा कारभार विस्कळीत
| महाड | प्रतिनिधी |
महाडसह परिसरामध्ये मान्सूनने दमदार वेळेत हजेरी लावली आहे. मात्र, या पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला असून, सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. धो धो पाऊस सुरू झाल्यास काय स्थिती निर्माण होईल, असा प्रश्नदेखील स्थानिक नागरिक करत आहेत.
राज्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी महाड आणि परिसरामध्ये गेली दोन-चार दिवसांपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत आहे. काही ठिकाणी जोराचा वारादेखील सुटत आहे. या पहिल्याच पावसात महावितरण विभागाचा कारभार विस्कळीत झाला आहे. गेली काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरण विभागाने गेली काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित ठेवला होता. मात्र, तरीदेखील पावसाळा सुरू झाल्यानंतर या ना त्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. महाड परिसरामध्ये अनेक गावांतून आजही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे, यामुळे लघु व्यावसायिकांवरदेखील परिणाम होत आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ आईस्क्रीम आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिकदेखील हवालदिल झाल्या आहेत. वीज बिल भरले गेले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना करणार्या अधिकार्यांकडून पावसाळ्यापूर्वी केल्या जाणार्या कामांची दखल मात्र वेळेत घेतली जात नाही. जागोजागी वृक्षांच्या फांद्या वीजतारांवरून आजही लटकत आहे. शिवाय, जागोजागी ट्रान्सफार्मर सताड उघडे पडले आहेत. यामुळे शेतकर्यांच्या, नागरिकांच्या जीविताला धोकादेखील निर्माण झालेला आहे.
पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे पावसाच्या तोंडावर केली जात असल्याने ऐन पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिकदेखील प्रचंड संतप्त झाले आहेत. अशी कामे एक महिना आधीच करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी केली जाणारी कामे ही सकाळीच करणे आवश्यक होते, मात्र भरदुपारी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने उष्णतेच्या काळात नागरिक हैराण झाले होते. या परिस्थितीत आजही बदल झालेला नसून कमी पावसामुळे उष्ण वातावरण कायम आहे, त्यातच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने केल्या जाणार्या कामांवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. महावितरणकडून सध्या स्थिती अनेक कामांचे ठेके दिले जात आहेत. या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची साधने वापरली जात असल्याचे तक्रार नागरिक करत आहेत. याबाबतीत अधिकारीदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. सातत्याने खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.