पाऊस गेल्याने भातकापणीच्या कामांची लगबग
| चिपळूण | प्रतिनिधी |
मागील तीन दिवसांपासून मान्सूनने परतीच्या प्रवासाचे स्पष्ट संकेत दिल्याने वातावरण मोकळे झाले आहे. पावसाने माघार घेण्यास सुरुवात केल्यामुळे आता शेतकरी भात कापणीला शेतात उतरला आहे. सध्या शहरासह तालुकाभरात ‘दिवाळी दारात आणि शेतकरी शिवारात’ असे चित्र निर्माण झाले आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाने शेतकर्यांच्या आशा संपुष्टात आणल्या होत्या. मात्र, आता पाऊस थांबल्यामुळे भातपीक कापणीची शेतकर्यांनी लगबग सुरू केली आहे. यावर्षीचा मान्सून हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त कालावधीपर्यंत लांबला. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून माघार घेईल, अशी शक्यता असतानाच गणेशोत्सवापासून सुरू झालेल्या मान्सूनने ऐन दिवाळीच्या उंबरठ्यापर्यंत हजेरी लावली. त्यामुळे कापणीसाठी तयार झालेले भातपीक शेतकर्यांना कापणी करण्यास अडथळा येऊ लागला.
पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचले, तर सोबतच्या वार्यामुळे काही ठिकाणची भातशेती पाण्यातच आडवी झाली. त्यातच जंगली प्राण्यांचा त्रास, लांबलेला पाऊस अशा एकूणच कचाट्यात शेतकरी सापडला होता. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी झाली. ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पडलेल्या पावसाने अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, आता पाऊस थांबल्यामुळे कोरडे वातावरण आणि उन्हाचा फायदा घेत शेतकरी सकाळपासूनच भातकापणीसाठी शेतात जाऊ लागला आहे. कापलेले भात सुकवून ऐन दिवाळीपर्यंत मळणी काढण्याच्या विचारात शेतकरी आहे.