| नेरळ | प्रतिनिधी |
आसल ग्रुप ग्रामपंचायतीमधील कचरा उचलण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ई-वाहन मंजूर करण्यात आले होते. ते वाहन मागील महिन्यात ग्रामपंचायतीकडे आले असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे ते धूळखात पडून आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते ई-वाहन कचरा उचलण्याचे काम करण्याऐवजी त्या गाडीच्या बाजूला कचरा आणि माती येऊन पडली आहे.
कर्जत-नेरळ मार्गवरील चार गावे आणि पाच आदिवासी वाड्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावे आणि आदिवासी वाड्या असल्याने रायगड जिल्हा परिषद स्वच्छता विभागाकडून कचरा संकलन करण्यासाठी हातरिक्षा आणि ई-वाहन देण्यात आले आहे. त्यातील ई-टेम्पो मागील महिन्यात ग्रामपंचायत प्रशासनाकडे आला आहे. त्याचवेळी याच ग्रामपंचायतीकडे काही महिन्यापूर्वी कचरा संकलन करणारी हातगाडीदेखील उपलब्ध झाली आहे. मात्र, यापैकी कोणतेही वाहन वापरात नसल्यामुळे ग्रामपंचायतीमधील विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून रायगड जिल्हा परिषदेने आसल ग्रामपंचायतीला जाब विचारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आसल ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्या ठिकाणी कर्जत पंचायतीतील अधिकारी हे प्रशासक आहेत. ग्रामपंचायत अधिकारी आणि ते असे दोघे कारभार सांभाळत आहेत. मात्र, त्यांच्या दुर्लक्षमुळे कचरा उचलण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठवलेले ई-वाहन धूळ खात पडले आहे.