आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर

21 जूनला माऊलींचे प्रस्थान
। पुणे । प्रतिनिधी ।
पाऊले चालती पंढरीची वाट,सुखी संंसाराची जोडूनिया गाठ या ज्येष्ट गायक स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भजन आळवित, टाळ मृदुंगाच्या निनादात,लाखो वारकर्‍यांची पाऊले यावर्षी आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यासाठी पंढरीकडे पडणार आहे. कोरोना साथीने गेले दोन वर्षे बंद असलेला वारीचा सोहळ्यास यावेळी अनुमती दिली असल्याने वारकर्‍यांना आता सावळ्य विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.10 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.
श्री क्षेत्र आळंदी येथून दि. 21 जूनला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी वारकरी तयारीला लागले आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये (जि. सातारा) अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील. तर, दिंडीकर्‍यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकर्‍यांना वाहन पास दिले जाणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी विकास ढगे यांची निवड करण्यात आली.

रिंगण सोहळा
पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्‍वांचे गोल रिंगण होणार आहे.

Exit mobile version