महाराष्ट्रात आषाढी वारी होणार, पण…


दहा पालखी सोहळेच बसने निघणार

परंपरेला अनुसरुन महाराष्ट्रात आषाढी वारी होणार आहे. पण, कोरोना संकटामुळे यंदा वारीसाठी फक्त दहा पालख्यांना बसने जाण्याची परवानगी आहे. पालखीसोबत निवडक वारकरी वारीला जातील. इतरांना घरी बसूनच आषाढीच्या दिवशी विठ्ठल पूजेचा सोहळा लाइव्ह बघण्याचा आनंद घ्यावा लागेल.

पुण्यात आषाढी वारी संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. दहा पालख्या वीस बसमधून पंढरपूरमध्ये जातील. मुख्य मंदिर भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंद राहील. पालखीसोबतचे वारकरी कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करुन विठुरायाचे दर्शन घेतील.

वारीत सहभागी होणार असलेल्या सर्वांना कोव्हिड प्रोटोकॉलनुसार आधी क्वारंटाइन केले जाईल. क्वारंटाइनचा कालावधी संपताच कोरोना चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच संबंधित व्यक्ती वारीत सहभागी होऊ शकेल. प्रत्येक पालखीसोबत जास्तीत जास्त 40 वारकरी बसमधून पंढरपूरला जातील. पायी वारीला मनाई आहे. शासकीय महापूजा मागच्या वर्षीप्रमाणे निर्बंध पाळून होईल. रिंगण आणि रथोत्सवासाठी पंधरा जणांना परवानगी दिली आहे. देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त 100 जणांना परवानगी आहे.
दहा पालखी सोहळ्यांना सशर्त परवानगी

  1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्‍वर)
  2. संत ज्ञानेश्‍वर महाराज (आळंदी)
  3. संत सोपान काका महाराज (सासवड)
  4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
  5. संत तुकाराम महाराज (देहू)
  6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)
  7. संत एकनाथ महाराज (पैठण)
  8. रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)
  9. संत निळोबाराय (पिंपळनेर-पारनेर अहमदनगर)
  10. संत चांगाटेश्‍वर महाराज (सासवड)
Exit mobile version