। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक जवळ असलेला आषाणे येथील धबधबा पावसाळ्यातील आकर्षण बनला आहे. पावसाळ्यातील चार महिने लाखोच्या संख्येने पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेत असतो. यामुळे धबधबा अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आषाणे गावाच्या मागील बाजुस असलेल्या डोंगरावरून उडणारे पावसाचे तुषार खाली 40 फुटावर झेलण्यासाठी पर्यटक वर्षासहलीच्या निमित्ताने येथे येत असतात. लोकल ट्रेनने आलेल्या पर्यटकांचे पाय उमरोली गावातून धबधब्याकडे वळतात. मात्र, त्या रस्त्याने जाताना एक लहान ओढा असून तो पार करताना गतवर्षी एका चिमुरडीसह दोघांचा बळी गेला होता. मात्र, याच रस्त्याने बहुतेक पर्यटक धबधबा परिसरात पोहचतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे या धबधब्याचा डोह जेथे आहे तेथून तब्बल दीड किलोमीटरपर्यंत कुटुंबासह आलेले पर्यटक पाणी वाहून नेणार्या ओढ्यात बसून पाण्याच्या आनंद घेऊ शकतात. मुख्य डोहातील पाण्यासोबतची मौजमजा घेताना काळजी घेतल्यास पुढे अन्य जागेवर हा धबधबा तसा सुरक्षित आहे. मात्र, धबधब्याच्या मुख्य डोहात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात कोसळत असल्यास पाण्यासोबत अनेकदा दगड वाहून येतात. हे दगड पाण्याच्या प्रवाहाखाली असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून अपघात होऊ शकतो. अन्य कुठेही या धबधब्यावर धोका नसल्याने कुटुंब कबिल्यासह पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात.