अघोरी कृत्यांचा संशय, सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
| पनवेल | दीपक घरत |
कळंबोली गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राहिलेली राख चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी घडत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अघोरी कृत्यांचा संशयही व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ठेवण्यात आलेली राख दुसऱ्या दिवशी अचानक गायब होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोण करत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मते, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमीत येऊन ही राख घेऊन जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, काही नागरिकांकडून अघोरी कृत्यांसाठी ही राख चोरी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र स्थळी घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्मशानभूमी परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. रात्रीच्या वेळी कोणीही सहजपणे येथे प्रवेश करू शकत असल्याने हा प्रकार घडत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
स्मशानभूमी परिसरात सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त ठेवावी, अशी मागणी भगत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पवित्र स्थळी घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
पालिका हद्दीत एकूण 79 स्मशान व दफनभूमी
पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण 79 स्मशानभूमी व दफनभूमी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये या स्मशान व दफनभूमींची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात मृतदेह दहन विधीचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. मात्र, नागरिकांकडून मागणी झाल्यास पालिकेकडून दहन विधीसाठी आवश्यक लाकडे पुरवली जातात.
पालिका अधिकारी







