अष्टमी मराठी शाळेचे स्वच्छतेत पाऊल पुढे

पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यात प्रभावी कामगिरी

| खांब | वार्ताहर |

रोहा न.पा. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यामंदिर अष्टमी मराठी शाळेने शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पामध्ये राज्यात प्रभावी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा 2 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला आहे. या उपक्रमात 64 हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. या कार्यक्रमातंर्गत पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत 64 हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी 100 शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केले जाणार आहे. यामध्ये रोहा न.पा. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यामंदिर अष्टमी मराठी शाळेने प्रभावी कामगिरी केली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता नारायण पानसरे यांनी मार्गदशन करून सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर थुंकणाऱ्या व कचरा करणाऱ्या लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. तसेच शाळेतील शिक्षक सचिन पवार नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना सहकार्य करत होते. रोहा नगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी मधुकर सूर्यवंशी यांनी रोहा न.पा. अष्टमी मराठी शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version