| खालापूर | संतोषी म्हात्रे |
महड येथील वरदविनायक अष्टविनायकांपैकी एक आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरपासून हाळ या गावाजवळ महड हे तीर्थस्थळ आहे. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती अशी या गणरायाची ख्याती आहे.
येथील वरदविनायक मंदिर पूर्व दिशेला मुख असलेले आहे. हे मंदिर बाहेरून पाहताना एखाद्या कौलारू घरासारखे दिसते. आत जाऊन पाहताच कोरीव नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर पाहावयास मिळते. मंदिराच्या सर्व दिशांना दोन-दोन हत्ती कोरलेले दिसतात. मंदिराचा घुमट पंचवीस फूट उंच असून, त्यावर सोनेरी कळस आहे. मुख्य मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिराच्या जवळ देवाचे तळे आहे. उन्हाळ्याशिवाय इतर वेळी तळ्यात पाणी असते.
मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून, नवीन मंदिर अतिदेखणे आणि सुंदर आहे. मात्र, मंदिराचा पेशव्यांनी बांधलेला हेमाडपंथी पद्धतीचा गाभारा होता, तो तसाच ठेवण्यात आला आहे. मंदिराजवळ असलेल्या तळ्यात वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सापडली. मात्र, ही मूर्ती भग्न झाल्याने त्या मूर्तीचे विसर्जन करून देवस्थानने नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते.
वरदविनायकाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती गाभार्यात पाषाणाच्या महिरपी सिंहासनावर बैठ्या आसनात असून, सिंहासनापासून वेगळी आहे. मूर्ती डाव्या सोंडेची, सुंदर आणि रेखीव आहे. गाभार्यात रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती कोरीव पाषाणाच्या असून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यांत गणेश मूर्ती दिसून येतात. तीर्थक्षेत्राची विशेषतः मढ, पुष्पक, भद्रक, मणिपूर अशी या तीर्थस्थळाची पौराणिक नावे आहेत. आताचे प्रचलित रूढ नाव आहे, महड. यात्रेकरूंनी हे लक्षात ठेवावे की, रायगड जिल्ह्यात महाड नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. महाड आणि महड या नावाबाबत यात्रेकरूंचा गोंधळ होण्याची शक्यता असते. तेव्हा महड हे नाव पक्के लक्षात ठेवून ते खोपोलीजवळ, खालापूर तालुक्यात पुणे-मुंबई महामार्गा- लगतच आहे, हे समजून घ्यावे.
हे देवस्थान नवसाला पावणारे आहे असे मानले जाते. येथे येणार्या भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवास असून, खासगी ठिकाणीही भोजन व निवासाची सोय होऊ शकते. देवस्थानतर्फे दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.