| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत रविवारी (दि.7) भक्तीमय वातावरण फुलले होते. वर्षातील शेवटची संकष्टी असल्याने श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी मंदिर परिसर यात्रेच्या स्वरूपात गजबजून गेला होता.
रविवारी श्री बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री बल्लाळेश्वराला पारंपरिक आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. मंदिराच्या प्रांगणात रंगीबेरंगी रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय केले होते. दर्शनासाठी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक पालीत दाखल झाले होते. काही भाविकांनी पायी प्रवास करत, तर काहींनी दिंडीच्या माध्यमातून मंदिरात हजेरी लावली होती. भाविकांच्या मोठ्या संख्येने झालेल्या आगमनामुळे परिसरातील हॉटेल्स, खाणावळी, खेळणी, शोभिवंत वस्तू, खाऊ, नारळ, हार, पापड, निर्गुंड, सरबत, प्रसाद व पेढे विक्रेत्यांचा धंदा तेजीत होता . यात्रेच्या निमित्ताने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाल्याचे चित्र दिसून आले.







