आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

भारत-पाकचा मुकाबला 2 सप्टेंबरला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 19 जुलै रोजी आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धचा थरार येत्या 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत अ गटात आहे आणि त्याच्यासोबत पाकिस्तान आणि नेपाळही आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाने आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही.

संघ निवडीसाठी बैठक
आता आशिया कपचे सूत्र दिल्लीतून हलणार आहेत, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीची सोमवारी (21 ऑगस्ट) दिल्लीत बैठक होणार आहे. कर्णधार रोहित शर्माही निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. संघनिवडीला उशीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक खेळाडू जखमी आहेत. त्यातील काही खेळाडू हळूहळू पुनरागमन करत आहेत. भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होते. राहुल सध्या सराव करत आहे आणि पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. आता त्याची संघात निवड होते की नाही हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर अजूनही शंका आहे. अय्यरने फलंदाजीचा सरावही केला, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाही. बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या टी-20 मध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

संपूर्ण वेळापत्रक :
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान – 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ – 4 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – 5 सप्टेंबर

सुपर-4
अ 1 विरुद्ध ब 2 – 6 सप्टेंबर
ब 1 विरुद्ध ब 2 – 9 सप्टेंबर
अ 1 विरुद्ध अ 2 – 10 सप्टेंबर
अ 2 विरुद्ध ब 1 – 12 सप्टेंबर
अ 1 विरुद्ध ब 1 – 14 सप्टेंबर
अ 2 विरुद्ध ब 2 – 15 सप्टेंबर
अंतिम सामना – 17 सप्टेंबर

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये तसेच प्रसारमाध्यमांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. जर भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर प्रसारमाध्यमे, प्रेक्षकांनी संघातील खेळाडूंवर दबाव टाकणे थांबविले पाहिजे, असे परखड मत पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान शोएब अख्तर म्हणाला की, प्रसारमाध्यमांमुळे भारतीय संघावर खूप दडपण येत आहे आणि हे प्रत्येक वेळी घडते. भारत पाकिस्तानकडून हरत नाही कारण त्याच्याकडे प्रतिभावान खेळाडू नाहीत असे नाही पण, मीडियाचा त्यांच्यावर खूप दबाव असतो. याकडेही त्याने लक्ष वेधले. अख्तर म्हणाला की, मागच्या वेळीही आशिया चषकादरम्यान भारतीय मीडियाने खूप दबाव आणला होता. संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगात रंगवण्यात आले होते. भारतीय संघ पाकिस्तानला सहज हरवणार असल्याचं बोललं जात होतं. यामुळे आमच्यावर कामगिरीचे कोणतेही दडपण नव्हते. याचा परिणाम असा झाला की, भारत दडपणाखाली तुटून पडला आणि आम्ही मुक्तपणे खेळून सामना जिंकला. त्यामुळे मुळात हा दबाव टाकणे बंद झाले पाहिजे.असेही त्याने नमूद केले.

बीसीसीआय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून आयसीसीकडे येणारा पैसा महसूल वाटणीअंतर्गत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठवतो. पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना त्या पैशांच्या जोरावरच मॅच फी मिळते. त्यामुळे एकप्रकारे भारतातून येणाऱ्या पैशावर आमचे क्रिकेट चालते.

शोएब अख्तर, माजी क्रिकेटर

रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तर पुढे म्हणाले, 2023 विश्वचषक हा सर्वात वेगळा आणि रोमांचक असेल. कारण मला आता 50 षटकांच्या क्रिकेटचे भविष्य दिसत नाही. या विश्वचषकातून भारताने भरपूर कमाई करावी अशी माझी इच्छा आहे. हे सांगायला अनेकांना संकोच वाटेल पण मी स्पष्टपणे सांगतो की, भारताचा महसूल आयसीसीला जातो. त्याचा वाटा पाकिस्तानातही येतो आणि त्यातून आपल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते. म्हणजेच भारतातून येणाऱ्या पैशातून आपल्या युवा क्रिकेटपटूंचे पालनपोषण होत आहे. असेही त्याने सांगितले.

Exit mobile version