आशिया चषक क्रिकेट स्पर्धा; भारत पाकमध्ये जाणार नाही

बीसीसीआयकडून स्पष्टीकरण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

काहीही झाले तरी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर कदापि जाणार नाही, असे आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यानी जाहीर केले आहे. यामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेबाबत पुन्हा विवाद निर्माण झाला आहे. आशिया कप आणि विश्‍वचषकाबाबत पाकिस्तानचे नाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर निश्‍चित करण्यात आली असली, तरी पाकिस्तान त्यावर गदारोळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ इथे आला नाही तर पाकिस्तानचा संघ विश्‍वचषकासाठी तटस्थ ठिकाणी सामन्याची मागणी करेल, असे पाकचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याला आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काहीही झाले तरी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ सध्या आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या बैठकीसाठी डर्बनमध्ये आहेत. अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले की बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ यांची आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्‍चित झाले. आधी जे बोलले होते त्याच्याशी समत आहे. पाकिस्तानमध्ये साखळी टप्प्यातील चार सामने आणि त्यानंतर श्रीलंकेत नऊ सामने होतील. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा समावेश आहे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळले तर तेही श्रीलंकेतच होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. अरुण धुमाळ यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार असल्याच्या पाकिस्तानी मीडियामध्ये येत असलेल्या अटकळांचे खंडन केले. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांच्या हवाल्याने अशा बातम्या येत होत्या. धुमाळ म्हणाले, मअसे काही झाले नाही. भारतीय संघ किंवा आमचे सचिव पाकिस्तानात जाणार नाहीत. फक्त कार्यक्रम ठरला आहे. भारतीय संघ श्रीलंकेतील डंबुला येथे पाकिस्तानशी खेळू शकतो. पाकिस्तानचा आपल्या भूमीवर एकमेव सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामने होणार आहेत.

पाक खेळाडू संतप्त
मझारी यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने चांगलाच समाचार घेतला. तो आपल्या यू ट्यूब चॅनवर बोलताना म्हणाला की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. मजर हे प्रकरण विचाराधीन आहे, मग त्यांना यावर विचार करू द्या. जर त्यांनी निर्णय घेतला तर तो घोषित केला जाणे गरजेचे आहे. जर सामान्य लोकं अशा प्रकारची जर तरची भाषा करत असतील तर ठीक आहे. मात्र मंत्र्यांनी सुरू असलेली चर्चा निर्णय म्हणून घोषित करू नये. जर तुम्हाला वाटते की संघ पाठवणे योग्य नाही तर पाठवू नका. सलमान बट पुढे म्हणाला की, मतुम्हाला जे हवं ते तुम्ही करा मात्र तुमचं मत आणि खासगी चर्चा या ज्यावेळी निर्णय होईल त्याचवेळी उघड करा. पाकिस्तानचे क्रीडामंत्री मझारी यांनी सांगितले की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी आयसीसीच्या डर्बन येथील बैठकीत पाकिस्तानचे वनडे वर्ल्डकपचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली होती.

Exit mobile version