भारताची अमिरातीवर सहज मात; बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत दाखल
| सोलो | वृत्तसंस्था |
भारताने संयुक्त अरब अमिराती संघाचा 110-83 असा पराभव करीत आशिया ज्युनियर बॅडमिंटन मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ‘ड’ गटात समावेश असलेल्या भारताने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेला आश्वासक सुरुवात केली होती. हाँगकाँगनेदेखील दोन्ही सामने जिंकले असून, भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांनी गटातून बाद फेरीत स्थान मिळवले आहे. आता रविवारी भारत आणि हाँगकाँग यांच्यात गटातील अव्वल स्थानासाठी निर्णायक लढत पार पडणार होती.
या अजिंक्यपद स्पर्धेत रिले गुणांकन पद्धत वापरण्यात आली आहे. त्यानुसार 10 सामन्यांत एकूण 110 गुण मिळवणारा संघ विजेता ठरतो. अमिरातीविरुद्धच्या लढतीत भारताची सुरुवात दमदार झाली. मुलींच्या एकेरीत रुजुला रामूने मायशा खानला 11-5ने पराभूत केले. त्यानंतर मिश्र दुहेरीत सी. लालरामसंगा आणि तारिणी सूरी या जोडीने भारताचे आघाडीचे गुण 22-11 पर्यंत नेले. अमिराती संघाकडून काही सामन्यांत चुरशीचा प्रयत्न झाला तरीही भारताने आघाडी कायम राखली. मध्यांतराला भारत 55-41 अशा आघाडीवर होता. यूएस ओपनची उपविजेती तन्वी शर्मा हिने माधुमिता सुंदरपंडियनविरुद्ध शानदार खेळी करीत भारताचे गुण 66-46वर नेले.
लालरामसंगाने मिश्र दुहेरीत रेसिकासोबत खेळताना अदित्य किरण आणि मायशा खान यांच्यावर 11-5ने विजय मिळवून भारताचे गुण 77-51 वर नेले. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. भारताने मिश्र संघ प्रकारात आपले सर्वोत्तम यश 2011मध्ये ब्राँझ पदक जिंकून मिळवले होते. मात्र गतवर्षी भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध 2-3 असा पराभूत झाला आणि पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.
17 संघांचा सहभाग
या वर्षीच्या स्पर्धेत 17 संघ सहभागी झाले आहेत. त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तीन गटांत प्रत्येकी तीन संघ असून, एका गटात पाच संघ आहेत. प्रत्येक संघ गटातील इतर सर्व संघांविरुद्ध एकदाच खेळतो. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.







