काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरी पट्टे

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी कर्जत तालुक्यातील महत्वाचा रस्ता समजल्या जाणार्‍या राज्यमार्ग रस्त्यावर ठेकेदाराकडून बनवाबनवी सुरू आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर आपले अपयश झाकण्यासाठी ठेकेदार कंपनीने चक्क डांबरी पट्टे मारून रस्त्याची दुरुस्ती केली आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग त्या रस्त्याचे काम पाहणार्‍या ठेकेदाराला त्याबाबत फैलावर घेत नसल्याने ठेकेदार कंपनीची भूमिका मस्तवाल बनली आहे.
तालुक्यातील महत्वाचा रस्ता म्हणून कर्जत-कल्याण राज्यमार्ग ओळखला जातो. या रस्त्यावर कर्जत ते शेलू येथील जिल्हा हद्द पर्यंतचा 23 किलोमीटर लांबीचा भाग पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. त्या रस्त्याचे आरसीसी काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने 2018- 2019 मध्ये पूर्ण केले आहे. सदर रस्त्याचे काम शासनाच्या हायब्रीड तत्वावर केले गेले असून ठेकेदाराला संबंधित रस्त्याची देखभाल दुरुस्ती 10 वर्षे करायची आहे. त्यामुळे रस्ता सुस्थितीत राहील अशी वाहनचालक यांना अपेक्षा आहे.
मात्र ठेकेदाराने रस्ता बनविताना बनवाबनवी केली असून कर्जत पासून वडवली पर्यंतचा भाग सिमेंट काँक्रीटचा बनविला आणि पुढील रस्ता काँक्रीटचा करण्याचे काम मंजूर असताना देखील वडवली ते शेलू येथील जिल्हा हद्द पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करून दिला. या रस्त्यावर सतत दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदाराला शासनाच्या नियमानुसार करावी लागणार आहेत. मात्र ठेकेदार कंपनी रस्त्याचे काम करताना ज्याप्रमाणे काँक्रीटकरण ऐवजी अर्धा भाग डांबरीकरणचा करून मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला होता. अगदी तसेच आता रस्त्याची दुरुस्ती करताना ठेकेदार कंपनी करताना दिसत आहे.
कर्जत पासून वडवली पर्यंत केलेला सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ठेकेदाराने आपली ही चूक सुधारण्यासाठी रस्त्याचे जुने काँक्रीटकरण खोदून तेथे नवीन काँक्रीटकरण आवश्यक आहे. असे असताना ठेकेदार कंपनीने काँक्रीटच्या रस्त्यावरील खराब झालेल्या भागातील खड्डे डांबरी पट्टे मारून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रस्ता काँक्रीटचा होता हे आता विसरण्याचा वेळ वाहन चालकांवर आली आहे. रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी शासनाने 64 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि त्या निधीमधून 23 किलोमीटरचा अखंड रस्ता ठेकेदाराने तयार केला नव्हता. आता काँक्रीटचे काम योग्य दर्जाचे न करणार्‍या ठेकेदार कंपनीने आपले अपयश झाकण्यासाठी आता खराब काँक्रीट रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग देखील ठेकेदारांच्या अशा कामामुळे परेशान असून देखील ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. दुसरीकडे खराब काँक्रीटच्या रस्त्यावर नवीन काँक्रीटकरण करणे आवश्यक असताना देखील ठेकेदाराने डांबरी पट्टे मारून जनतेचा निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराबद्दल सुनील गोगटे यांनी रस्त्याच्या या बनवाबनवीची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version