| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीला अवघे पस्तीस दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या तुलनेत नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने तुर्त तरी बाजी मारली आहे. महायुतीमध्ये जागा कुठल्या पक्षाला व उमेदवार निश्चिती अद्याप दूर असल्याने महायुतीमधील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. पुढील पस्तीस दिवसांमध्ये ग्रामीण भागात पोहोचण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या उमेदवारासमोर राहणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सरळ लढत होणार असल्याचे तुर्त तरी दिसून येत आहे. 20 मे रोजी निवडणूक असल्याने अध्यापक महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. त्यातही भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेचा शिंदे गट कोणाला जागा सोडावी याबाबत मात्र अद्यापही अनिश्चितता आहे.
पारंपरिक पद्धतीने शिवसेनेने जागेची मागणी केली आहे तर शहरांमध्ये तीन आमदार असल्याने भाजपला नाशिकची जागा हवी आहे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा हवी आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागेवरून वाक्युद्ध रंगले आहे.
इच्छुकांच्या मुंबईच्या फेर्या वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईवरून इच्छुक परतताना फक्त आश्वासन घेऊन येतात, ठोस असा निर्णय होत नसल्याने घालमेल वाढली आहे. महायुतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या दावे व प्रतिदावे वाढले आहेत.