महाराष्ट्रात घातपाताचा कट पंजाबमध्ये उघड

चार दहशतवाद्यांना अटक
। कर्नाल । वृत्तसंस्था ।
हरियाणातील कर्नालमध्ये चार संशयित खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दहशवाद्यांना ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे पोहोचवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी दिल्लीमार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे निघाले होते. त्यामुळे या सर्वांचा महाराष्ट्रात घातपाताचा कट होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी 20 ते 22 वयोगटातील असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे. गुरप्रीत, संदीप, परमिंदर आणि भूपेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील तीन फिरोजपूरचे रहिवासी आहेत तर एक लुधियानाचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी पंजाब येथून राजधानी दिल्ली येथे जात होते. त्यावेळी पोलिसांच्या चार पथकांनी दिल्ली चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील बस्तारा टोलजवळ एक इन्होवा गाडी थांबवली. त्यावेळी पोलिसांनी गाडीतून चार दहशवाद्यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या गाडीतून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 जिवंत काडतुसे, गनपावडरने भरलेले कंटेनर आणि दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Exit mobile version