पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी 17 वर्षीय मुलासह त्याच्या 22 वर्षीय बहिणीला मारहाण आणि विनयभंग केल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात शुभम (30) आणि यश (27) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल येथील आर्यन पाटील हा शनिवारी (दि.3) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आपल्या बहिणीसोबत कारने सेक्टर 6 येथील बिकानेर स्वीटमार्ट येथे गेला होता. त्यावेळी बहिणीने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून मिठाई आणण्यासाठी दुकानात प्रवेश केला, तर आर्यन गाडीतच बसला होता. त्याचवेळी महिंद्रा थारमधून आलेल्या चालकाने आर्यनला गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर चालकासह अन्य एका व्यक्तीने आर्यनला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आर्यनला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, लोखंडी कड्याने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपींनी तिच्याशीही शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिचा हात धरून खेचणे, केस ओढणे, कपडे फाडणे तसेच छातीवर ढकलून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Exit mobile version