जम्मू-काश्मीर, हरिणाचं बिगुल वाजलं
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अखेर जम्मू-काश्मीर, हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवारी (दि. 16) वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात, तर हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल लागणार, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लांबवणीवर टाकल्या आहेत. राज्यात सक्रीय असणारा मान्सून, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्याचे कारण आयोगाने दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. अशातच ज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरला पार पडतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकाचं वेळापत्रक मात्र जाहीर केले नाही. झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील, असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे.
झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारी 2025 पर्यंत आहे, तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. 2019 मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून मांडण्यात येत होता. मात्र, आता दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार. पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार 18 सप्टेंबर, दुसरा टप्प्यातील मतदान पार पडणार 25 सप्टेंबरला, तिसर्या टप्प्यातील मतदान पार पडणार 1 ऑक्टोबरला, तर दुसरीकडे हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 तारखेला मतदान पार पडणार आहे. दोन्ही राज्यांचा निकाल 4 तारखेला लागणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली.