आरक्षणासाठी विधानसभा लढविणार

288 उमेदवार उतरवणार रिंगणात; मनोज जरांगेंचा सरकारला ईशारा

| जालना | वृत्तसंस्था |

मनोज जरांगे  आज 8 जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 4 जून रोजीच्या उपोषणाच्या तारखेत बदल करत 8 जून रोजी केली होती. त्यानुसार आजपासून मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ते अंतवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

संपूर्ण मराठा समाजाला माझे आवाहन आहे की, आपण शांततेत राहायचं. आमच्या आंदोलनाविरोधात काही निवेदनं जाणीवपूर्वक देण्यात आले आहेत. मात्र, भविष्यात आम्हीही असे निवेदन देऊ. तुमच्या काही रॅली निघतील. मग त्यावेळी आम्हीही अशा प्रकारचे निवेदन द्यायचे का? महाराष्ट्रात रॅली तुम्ही काढणार असाल तर आम्हालाही रहदारीला त्रास होणार आहे. मग तुम्ही तुमची रॅली रद्द करणार आहात का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची मागणी असलेल्या सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी एवढीच आमची मागणी आहे. या मागणीसाठीच आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे. तर सरकारला हा कायदा करण्यासाठी काही पुराव्याची गरज लागत असेर तर तब्बल 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, राज्यातील मराठा आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घेऊ. मात्र, एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. यामध्ये अनेक विषय आहेत. आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशीच आमची मागणी आहे. सरकाच्यावतीने निवेदनं देण्यात आली. मात्र, मी आचारसंहितेचा सन्मान केला. 4 जून रोजीचं उपोषण 8 जून रोजी केलं. आमच्या आंदोलनाच्या विरोधात निवेदन देणारे कोण आहेत? हे सर्वांना माहिती आहेत. मोदींच्या शपथविधीमुळे जनतेला त्रास होणार असेल तर मग शपथविधीचा कार्यक्रण होणार नाही का?, असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.

आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं. त्यामुळे पुन्हा परवानगीची आवश्यकता नाही. यावेळी कडक उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत आहोत की त्यांनी पुढे येऊन हा विषय मार्गी लावावा. मात्र, ते लक्ष देत नाहीत. आमचं ध्येय मराठा आरक्षण मिळवणं हेच आहे. जर आरक्षण दिलं नाही तर महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही. मग ती तुमची जबाबदारी असेल. भारतीय जनता पक्षातील जेवढे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगावं. अन्यथा विधानसभेला नावं घेऊन पाडणार, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Exit mobile version