विद्यार्थ्यांची होणार मूल्यमापन चाचणी

तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश

| रायगड | प्रतिनिधी |

स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणी आणि दोन संकलित मुल्यमापन चाचण्या अशा तीन चाचण्यांचे वेळापत्रक राज्य पातळीवरुन जाहीर करण्यात आले आहे. यात सोमवारपासून जिल्हा परिषद आणि शासकीय अनुदानीत शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मुल्यमापन चाचणी परीक्षांना सुरूवात होणार आहे. त्याची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने दरवर्षी राज्यभर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, यासह दोन संकलित मुल्यमापन चाचण्या घेण्यात येत आहे. पूर्वी घटक चाचणी, प्रथम सत्र आणि द्वित्तीय सत्र परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र, त्याऐवजी राज्य पातळीवरून दोन संकलित मुल्यमापन चाचण्या घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका यांच्यावतीने तयार करण्यात येत असून त्यानूसार परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या चाचणी परीक्षा आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रकल्प असून तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 30 ऑक्टोबरला भाषा विषय, 31 तारखेला गणित 1 नोव्हेंबरला इंग्रजी विषयांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिकासोबत शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूची विषयनिहाय, शाळानिहाय आणि इयत्तानिहाय शाळांना पुरविण्यात येणार आहे. संबंधित चाचण्या दहावी-बारावी परीक्षेप्रमाणे नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने सांगण्यात आले. या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली असून परीक्षेच्या नियोजनासाठी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक हे तयारी करत आहेत, असे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले.

Exit mobile version