| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील धामोते कोल्हारे येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पडला. यावेळी आगरी समाजातील दहावी-बारावीमधील 160 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी समाज संघटना वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला आहे. याकार्यासाठी आगरी समाजाचे नेते सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी जाहीर केले. तर, कर्जत तालुक्याच्या आगरी समाज हॉलचे सुशोभीकरणासाठी 10 लाखाचा निधी कामगार नेते राष्ट्रीय इंटक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले. यावेळी मुंबई ईशान्य मतदारसंघाचे खासदार संजय पाटील, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कुळगाव-बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अखिल आगरी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद म्हात्रे, आगरी कोळी गावठाण क्षेत्र याचिकाकर्ते जयेंद्र खुणे, जि.प. माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कोल्हारेचे सरपंच महेश विरले यांच्यासह वसंत कोळंबे, सावळाराम जाधव, भरत भगत, ए.टी. पाटील, सूर्यकांत चंचे, शरद भगत आणि संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष भगवान धुळे, शिवाजी कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.







