। कल्याण । प्रतिनिधी ।
नादुरुस्त वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीत व्यस्त असलेल्या सहायक अभियंत्याला दमदाटी व मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.1) मध्यरात्री डोंबिवलीच्या कैलासनगर-शास्त्रीनगर भागात घडली आहे. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मुकेश पुंडलिक पाटील व रुपेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
उच्चदाब वाहिनीतील बिघाडामुळे मंगळवारी रात्री जुन्या डोंबिवलीतील कैलासनगर-शास्त्रीनगर भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जुनी डोंबिवली शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता जयेश बेंढारी कर्मचार्यांसह दुरुस्तीचे काम करत या भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करत होते. सहायक अभियंता बेंढारी हे इंदिरानगर भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करुन कैलासनगर चौकात आले. यावेळी आरोपी मुकेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी बेंढारी यांना अडवले व अपमानजनक भाषा वापरली. बेंढारी यांनी असभ्य भाषेवर आक्षेप घेतल्यानंतर मुकेश पाटील यांच्यासोबत असलेल्या एकाने बेंढारी यांच्या कानाखाली चापट मारली. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.