। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यातील थळ व नवगाव येथील आर.सी.एफ. बाधित मच्छिमार बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात 12 एप्रिल रोजी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आ. रमेश पाटील यांच्या निवासस्थानी आर.सी.एफ.चे महाप्रबंधक श्रीनिवास कुलकर्णी, संजीव हरळीकर, धनंजय खामकर यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील व प्रकल्प बाधित मच्छिमार बांधव उपस्थित होते. गेल्या 35 ते 40 वर्षापासून आर.सी.एफमध्ये बाधित स्थानिक मच्छिमार बांधव मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आरसीएफ कंपनीकडून मच्छिमार बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे मच्छिमार बांधवांचे नुकसान होत आहे. यामुळे गेल्या आठवड्यात आ. पाटील व शिष्टमंडळाने केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेऊन आरसीएफ बाधित मच्छिमार बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती.
यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार आर.सी.एफ. च्या अधिकार्यांनी आ. पाटील व मच्छिमार बांधवांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये मच्छिमार बांधवांना वीज, पाणी, रस्ते या सुविधा येत्या दोन महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आऊट फॉल चॅनेल केंद्र सरकार, राज्य सरकार व आर.सी.एफ. एकत्रित निधी उपलब्ध करून लवकरच बांधण्यात येईल असे आरसीएफ अधिकार्यानी सांगितले. त्याचप्रमाणे यामध्ये दिरंगाई झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्तकरुन आजपर्यंत ज्या मच्छिमार मरीन आऊट फॉल पाईप लाईनमध्ये नुकसान झाले आहे, त्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
मच्छिमारांना मदतीचे आश्वासन
