। सुधागड-पाली । वार्ताहर ।
गोकुळाष्टमी हा पारंपरिक महत्वाचा व उत्साहाचा सण आहे. सर्व अबाल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. मंगळवारी (ता.27) सुधागड तालुक्यात पाली, जांभूळपाडा, परळी, पेडली आदी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. पारंपरिक पद्धतीने तसेच पारंपारिक पेहराव व पारंपरिक वाद्यांच्या चालीवर गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे जांभूळपाडा येथील अनोखी प्रथा आहे. गोविंदाच्या अंगावर आसुडाचे (सोरट) फटके मारत दहीहंडी फोडली जाते.
आदिवासी वाड्या पाड्यावर देखील गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला. छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय होता. नृत्याचा ठेका धरत, गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते. तेथे दहिकाला, फळे आदी प्रसाद व अंगावर पाणी ओतून त्यांचे स्वागत झाले.
विशेष म्हणजे यंदा गोपाळकल्याला पावसाने हजेरी लावल्याने दहीहंडीचा उत्साह द्विगुणित झाला. मुसळधार पावसात व ढगाळ वातावरणात दहीहंडी फोडण्याची मज्जा काही औरच असते. त्यामुळे बाळ गोपाळ व मोठ्यांना आनंद झालेला दिसत होता. दहीहंडी एकावर एक थर लावून फोडतांना वरून पावसाच्या सरी अंगावर आल्यातर सर्वांना सुखद गारवा मिळतो. शिवाय थकवा जाणवत नाही. शरीरातील पाण्याची पातळी घटत नाही. आणि त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह अधिक वाढतो. परिणामी ते अनेक ठिकाणी जाऊन हंडी फोडण्याचा आनंद देखील घेतात. याशिवाय पाऊस असल्यामुळे हंडी जवळील माती भुसभुशीत होते. तिथे चिखल साठतो. त्यामुळे थर खाली कोसळले तरी कोणाला फारसी दुखापत होत नाही. हा फायदा देखील पावसाचा झाला.
दहीहंडी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रिती आहेत. मात्र अंगावर आसुडाचे म्हणजे चाबकाचे फटके मारून दहीहंडी साजरी करणारी प्रथा तुम्ही कधी पाहिलीये का? सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे अशा प्रथेतून दहीहंडी साजरी केली जाते. अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. येथे गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात. ही परंपरा केव्हापासून सुरु झाली हे सांगता येत नाही. मात्र मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे. प्रत्येक गावात अथवा जिल्ह्यात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी कृष्णजन्मावेळी रात्री 12 वाजताच दहीहंडी फोडली जाते. कोकणातील एका गावात विहीरीवर दहीहंडी बांधून ती फोडण्याची प्रथा आहे. या सर्व प्रथांमध्ये आसुडाचे फटकेमारत दहीहंडी फोडण्याची प्रथा पाहून अनेक जण थक्क झालेत.