सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

आरोग्य सेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व इतर पदे रिक्त
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सलाईनवर आहे. तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व इतर पदे रिक्त आहेत. परिणामी गाव तसेच आदिवासी वाड्यापाड्यांवर आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण देखील पडत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ही रिक्तपदे भरली जात नाही आहेत. आरोग्य सेविकांची मंजूर 16 पदांपैकी तब्बल 10 पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, कोरोना लस, विवीध आजारांची नोंद व औषधोपचार, रोग प्रतिबंधक कामे, आरोग्य विषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गरोदर स्त्रिया व विद्यार्थी यांची तपासणी, शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविणे आदि कामे रखडतात व वेळेत होत नाहीत. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची 14 पैकी निम्मी पदे रिक्त असल्याने विविध आजारांच्या रुग्णांची माहिती घेणे, नोंदी ठेवणे, त्यांना उपचारासाठी पाठविणे, तसेच कार्यालयीन विविध कामे खोळंबत आहेत. शिपाई नसल्याने साफसफाई व इतर कामे होत नाहीत.

सुधागड तालुक्यात आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. खेड्यापड्यात दुर्गम भागत राहणारे लोक हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच विसंबुन राहतात परंतु रिक्त पदांमुळे तेथे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. तर कधी पैसांअभावी उपचारांवार पाणी सोडावे लागत आहे.

आरोग्य सेविका उपलब्ध नसल्याने बर्‍याचदा आरोग्य उपकेंद्र बंद असतात. त्यामुळे लांबून येणार्‍या रुग्णांना परत जावे लागते. त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. शिवाय वेळ व पैसा देखील वाया जातो. लसीकरण व इतर कामे देखील वेळेवर होत नाहीत. त्यामुळे सर्व रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत.

– दर्शन तळेकर, तरुण सामाजिक कार्यकर्ते, पेडली


सदर रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीकोणातून जि.प कडे नियमित रिक्त पदांच्या आकडेवारीचा अहवाल सादर केला जातो. येथील रिक्त पदे भरल्यास आरोग्य सेवेचे कामकाज अधिक गतीने होईल. तरी उपलब्ध कर्मचार्‍यांवर नागरिकांना वेळवर व चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करतो.

-डॉ. नंदकुमार मुळे, वैद्यकीय अधिकारी, जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र




सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण
सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असून या अंतर्गत 14 उपकेंद्र आहेत. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास 43810 लोक अवलंबून आहेत. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर 28861 इतके लोक अवलंबून आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत या आरोग्य केंद्रांवर प्रचंड ताण येतो. शिवाय रिक्त पदे, सोयीसुविधांचा अभाव आणि सर्व उपचार मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. छोटे आजार, सर्पदंश, प्रसूती, अपघातग्रस्तांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात लोकांना जावे लागते. त्यामुळे लोकांची गैरसोय होतेच त्याबरोबर वेळ व पैसे देखील अधिक लागतात. परिणामी येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास लोकांना या व इतर आरोग्य सेवा येथेच उपलब्ध होणार आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील ताण देखील कमी होईल.

Exit mobile version