| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर पाली नगरीत गणेश जयंतीचे औचित्य साधून भक्ती आणि कलेचा एक अपूर्व संगम भाविकांना पाहायला मिळत आहे. ”पालखी बल्लाळेश्वराची” या भक्तीमय संकल्पनेवर आधारित 6 बाय 12 फूट आकाराची भव्य रांगोळी सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.
महाराष्ट्र राज्याचे नामांकित आर्टिस्ट योगेश डाकी यांच्या कल्पनेतून ही नेत्रदीपक रांगोळी साकारण्यात आली आहे. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी योगेश डाकी यांच्यासह अरुण काळोखे (पहूर), जय भोईर (अंबरनाथ), हर्षल डाकी (शेतपळस) आणि सुयोग म्हस्कर या कलाकारांच्या चमूने सलग 24 तास मेहनत घेतली. यासाठी सुमारे 10 किलो रंगांचा वापर करण्यात आला आहे.
या रांगोळीमध्ये वारकरी परंपरा, ढोल-ताशांचा नाद, टाळ-मृदंगांचा गजर आणि भाविकांचा भक्तीभाव इतक्या बारकाव्याने रंगवला आहे की, जणू काही बल्लाळेश्वराची पालखी प्रत्यक्ष पालीच्या भूमीतून मार्गस्थ होत असल्याचा भास निर्माण होतो. कलाकारांच्या रंगसंगती आणि जिवंत मांडणीमुळे भाविक या रांगोळीसमोर नतमस्तक होत आहेत. या उपक्रमासाठी श्री बल्लाळेश्वर देवस्थान संस्थानचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच नाना ठोंबरे, तुषार ठोंबरे आणि पाली येथील मवेडे चाळे ग्रुपफ यांनी या कलाकृतीसाठी विशेष मदत केली. येणाऱ्या काळात गणेश जयंतीनिमित्त यापेक्षाही अधिक भव्य आणि भव्यदिव्य रांगोळ्या साकारण्याचा आमचा मानस आहे. अशी भावना आर्टिस्ट योगेश डाकी यांनी यावेळी व्यक्त केली. या अनोख्या कलाकृतीमुळे पाली नगरीतील भक्तीमय वातावरणात अधिकच भर पडली आहे.






