| नागपूर | वृत्तसंस्था |
नागपूरचे प्रख्यात अॅथलेटिक्स प्रशिक्षक संजय उर्फ भाऊ काणे यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी (दि.17) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भाऊ काणे यांनी आपले अख्खं आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी वेचले. त्यांनी अॅथलेटिक्स प्रशिक्षणाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून 2009 साली स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय अॅथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी अॅथलेटिक्समध्ये नागपूरचे नाव मोठे केले.
भाऊ काणे यांच्या अॅथलेटिक्समधल्या कार्याचा राज्य शासनाने दादोजी कोंडदेव पुरस्काराने गौरव केला होता. भाऊंनी स्थापन केलेल्या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचा गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला सुवर्णमहोत्सव साजरा झाला. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाला भविष्यात काय करता येईल, याची आपल्या सहकार्यांशी ते वेळोवेळी चर्चा करत होते. त्यामुळं त्यांच्या निधनाने राज्यातील अॅथलेटिक्स चळवळीला मोठा धक्का बसला आहे.