धुळ्यात अटलास कॉपको इंडिया लि. यांच्या सहकार्यातून सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या अभियानांतर्गत सीएफटीआयच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील ४७६ ग्रामीण भागातील मुलींना अटलास कॉपको इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्यातून शुक्रवारी सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी अटलास कोपको इंडिया लिमिटेडचे सी.एस.आर प्रमुख अभिजीत पाटील, सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडियाच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील त्याच प्रमाणे लुपिन ह्यूमन वेलफेयर अँड रिसर्च या संस्थेचे जिल्हा प्रमुख निलेश पवार, जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट च्या विश्वस्त अश्विनी पाटील उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना अभिजीत पाटील यांनी लाभार्थी मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की, सायकलीचां रोज सुयोग्य वापर करून शाळेतील मुलींची घटत चाललेली उपस्थिती वाढवून, मुलींनी शिकून स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. तर सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडियाच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधताना सांगितले की अटलास कोपको इंडिया लिमिटेडच्या सहकार्यातून सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.

जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट तसेच सर्व मान्यवरांचे आणि सीएफटीआयच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले. धुळ्यातील मुलींशी संवाद साधताना खूप आनंद वाटला. सीएफटीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख सायकल वाटपाचा संकल्प पूर्ण करणार असल्याचा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. सर्व लाभार्थी मुली आणि पालकांनी त्यांना सायकल मिळाल्या बद्दल अटलास कोपको इंडिया लिमिटेड आणि सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Exit mobile version