| सुतारवाडी | वार्ताहर |
सुतारवाडी नाक्यावर एटीएम तसेच पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता असून, याबाबत संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सुतारवाडी परिसराचा झपाट्याने विकास होत असून, या परिसराला वास्तव्यासाठी येणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुतारवाडी हे गाव 16 वाड्यांचे मध्यवर्ती असे ठिकाण आहे. सुतारवाडी, येरळ, धगडवाडी, सावरवाडी, ढोकळेवाडी, गौळवाडी, कामत, कुठली, आंबिवली, जामगाव, पाथरशेत, जाधववाडी, खैरवाडी, जावटे तसेच विविध आदिवासी वाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथील नागरिकांना बँकेच्या कामासाठी किंवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोलाड येथे येण्या-जाण्यासाठी 60 ते 70 रुपये खर्च करून खासगी वाहनातून जावे लागत आहे. यासाठी नागरिकांचा वेळ आणि पैसे नाहक खर्च होत असतो.
सुतारवाडी परिसरात अनेक फार्म हाऊस असून, यामध्ये काम करणारे अनेक नोकरदार वास्तव्यास आहेत. त्यांना पैसे काढणे किंवा पाठवणे यासाठी कोलाडशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सुतारवाडी येथे एटीएमची सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच सुतारवाडी येथे पोलीस चौकीचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. कोलाड ते विळे या मार्गावर नेहमी अपघात किंवा कधी-कधी भानगडीसुद्धा उद्भवतात, यासाठी कोलाड किंवा रोहा येथे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी एटीएम आणि पोलीस चौकी होणे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.