‘माढ्यात भाजपच्या विरोधात वातावरण’

| माढा | वृत्तसंस्था |

माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप उमेदवारांच्या विरोधात वातावरण आहे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाचे कल्याणराव काळे यांनी दिली आहे. काळेंच्या या कबुलीने महायुतीच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भगीरथ भालके यांनी लोकांच्या कलानुसार निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावनिहाय बैठका घेण्यात आल्या. शुक्रवारी (ता. 5) सोलापूर लोकसभा मतदार संघातील 39 गावातील पदाधिकाऱ्यांशी तर शनिवारी (ता. 6) माढा लोकसभा मतदारसंघातील 58 गावातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

काळे यांनी विठ्ठल परिवाराची भूमिका नमूद करताना दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या विरोधात नाराजी असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी काळे म्हणाले, तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामध्ये काही लोकांनी पहिल्या उमेदवाराविषयी नाराजी असल्याचे सांगितले. काहींनी कामे झाली नाहीत असे सांगितले. त्यामुळे लोकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मतदारांची मानसिकता बदलली आहे. आम्ही ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता, भाजप विरोधात वातावरण असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version