ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद

रोख रकमेअभावी ग्राहकांची गैरसोय
पैसे काढण्यासाठी करावी लागतेय भटकंती

| आगरदांडा | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना मुरूड शहरातील अनेक बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक तसेच काही खासगी बँकांच्या एटीएम सेवा बंद असल्याने सणासुदीच्या काळात रोख रकमेची गरज असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातील काही प्रमुख ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, रोख रकमेचा तुटवडा किंवा सेवा बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना दुसऱ्या एटीएमचा शोध घेत दूरवर जावे लागत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विविध व्यवहारांसाठी रोख रकमेची गरज वाढली असताना एटीएम सेवा बंद असल्याने ग्राहकांच्या अडचणीत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात एटीएम सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित बँकांची असताना सेवा बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Exit mobile version