| चिपळूण | प्रतिनिधी |
शिवसेनेचे गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत.
घटनेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली. कोणाच्या आदेशानुसार सुरक्षा काढण्यात आली याचा जाब पोलीस अधिकार्यांना विचारण्यात आला. जय भवानी जय शिवाजी… अशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला आहे. मध्यरात्री जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोल, बॅट्स स्टंप आढळून आल्या होत्या. चिपळूण पोलिसांनी घराला भेट देत घराच्या आवारात सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अज्ञातांनी केलेला हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असला तरी या गंभीर प्रकाराची दखल पोलिसांनी मात्र तात्काळ घेतली आहे. भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे वृत्त समोर आलेले असतानाच आता पोलिसांनी घरावर हल्ला झालेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
फडणवीसांवर लक्ष्य
काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.