ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने माहिती दिली की, जीएफएस गॅलेक्सीवर हल्ला झाल्यानंतर त्वरित मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. जहाजावरील 11 भारतीयांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असली, तरी बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध व बचाव कार्यात ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. या संकटाच्या काळात सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या निवेदनात मंत्रालयाने या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता आणि व्यथा व्यक्त केली असून, हा कल अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version