राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला; कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

। वावोशी । प्रतिनिधी ।
बहुजन युथ पँथरचे कर्जत तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत तालुका सरचिटणीस बॉबी वाघमारे यांच्या चारचाकी गाडीवर समाजकंटकांनी गुरुवारी (दि.7) मध्यरात्री हल्ला केला. ही घटना कर्जत तालुक्यातील दहिवली गावात संजय नगर येथे घडली.
बॉबी वाघमाने एम.एच. 04 डी.एन. 8459 स्कोडा कंपनीची गाडी नेहमीप्रमाणे कामावरून आल्यावर आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभी करून घरी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा कामावर जाण्यासाठी बॉबी वाघमारे गाडीजवळ गेले असता त्यांना आपल्या गाडीची मागील आणि पुढील काच दगडाने फोडलेली दिसली. गाडीची झालेली दुरवस्था पाहून वाघमारे यांनी बहुजन युथ पँथर कोकण अध्यक्ष सुशील जाधव आणि कार्यकर्ते यांच्या समवेत कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा हल्ला काही समाजकंटकांनी केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध कर्जत पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच बॉबी वाघमारे यांच्या जिवाला सुद्धा धोका आहे. त्यासाठी पोलीस सुरक्षा द्यावी आणि हल्ला करणार्‍या समाजकंटकांना लवकरात लवकर शोधून कठोर शासन करावे, अशी मागणी बहुजन युथ पँथर संघटनेने कर्जत पोलिसांत केली आहे.

Exit mobile version