भाजपच्या रॅलीत हुल्लडबाजी; सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यांकडून निषेध
| सांगोला | प्रतिनिधी |
सोलापुरातील सांगोला तालुक्यात भाजपकडून रॅली काढण्यात आली होती. मात्र, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या घरावर दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.11) या घटनेचा निषेध व्यक्त करीत रविवारी सांगोला बंदची हाक दिली. शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलीस ठाण्याचे स.पो.नि. पोपट काशीद यांना निवेदन देण्यात आले व हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केलाय.

सत्तेचा माज आणि संस्कृतीचा अपमान; ओमराजेंनी सुनावलं
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या स्व. गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील घरावर भाजपच्या रॅलीदरम्यान दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही केवळ धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेली एक अमानुष चाप आहे. ही तीच भाजपा आहे का जी स्वतःला 'संस्कृतीरक्षक' म्हणवते? पण त्यांच्या रॅलीतून बाहेर येतंय दारूची नशा, गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद! पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, स्व. गणपतराव आबांसारख्या लोकनेत्यांच्या घरावर अशी घाणेरडी कृत्यं करून भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे की, सत्ता जेव्हा अहंकाराच्या नशेत चढते, तेव्हा माणुसकीचं भान हरवतं. ज्यांच्या घराचं दार बंद असतानाही आदर्शाचा सुगंध दरवळतो, त्या देशमुख कुटुंबावर झालेला हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील अधःपाताचं जिवंत उदाहरण आहे. महाराष्ट्र म्हणजे संयम, आदर आणि संस्कारांची भूमी. पण सध्याचं सरकार हेच संस्कार पायदळी तुडवत आहे. ना शिष्टाचार उरलेत, ना आदर्श. ही केवळ बाटली फेकण्याची घटना नाही, तर महाराष्ट्राच्या विचारसरणीवर फेकलेली घाण आहे. दारूच्या नशेत बुडालेली ही सत्ता लोकांच्या जागृतीसमोर फार काळ टिकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही.
रोहित पवारांनीही व्यक्त केला संताप
आमदार रोहित पवार म्हणाले, सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाआधी झालेल्या रॅलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्यातील स्व.गणपतराव देशमुख (आबा) यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घरात आबांच्या पत्नी व नातू विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख राहतात. सांगोल्याचे देशमुख कुटुंब हे राज्यातील एक आदर्श कुटुंब आहे. अशा भ्याड हल्ल््याने ते दबतील असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही सर्वजण याप्रसंगी देशमुख कुटुंबियाच्या सोबत आहोत.
सांगोल्यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला. काही पक्षाचे गद्दार आहेत, ज्यांना पक्षाने आर्थिकदृष्ट्या मोठे केले. गणपतरावांनी या गद्दारांना एक विचार देऊन सामाजिक संघटनांमध्ये आणून त्यांना सामाजिक स्थैर्य देण्याचे काम केले होते. गणपतराव देशमुखांच्या पत्नी रतन काकू एकट्या घरात असताना या गद्दारांनी हा भ्याड हल्ला केला. गणपतराव देशमुखांचे घर कष्टकऱ्यांचे प्रेरणास्थान आणि स्फूर्ती देणारे स्थान म्हणून महाराष्ट्रातील कष्टकरी कार्यकर्ता मानतो. त्याच निवासस्थानातून गणपतरावांनी सांगोल्याच्या जनतेची 55 वर्षे आमदारकीच्या माध्यमातून निरपेक्ष सेवा केली. विविध क्रांतिकारी निर्णय घेऊन कष्टकऱ्यांसाठी डाव्या विचारांचा आवाज उठवला. त्या कार्यकर्त्यांची गद्दारांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे निराशा झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी समाज सांगोलेकरांच्या सोबत आहे. लवकरच सांगोल्यात गणपतरावांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे विचार जनतेसमोर आणायचे आहेत. महाराष्ट्रातील डाव्या विचारांचा कार्यकर्ता देशमुख कुटुंबियांसोबत आहे. राज्याच्या विधानसभेत आणि सभागृहाबाहेर या घटनेसंदर्भात बाबासाहेब देशमुखांनी आवाज उठवायला हवा. ज्या गद्दारांनी हा निंदनीय प्रकार घडवून आणला आहे. त्याचा मी निषेध करतो. त्या गद्दारांना नष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष
सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी काहींनी त्यामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश झाल्यानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी रॅली काढली. ही रॅली शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरासमोर ही रॅली अली असताना काही समाज कंटकांनी स्वर्गीय आबांच्या घरावर दगडफेक आणि दारूच्या बाटल्या फेकण्याचे अत्यंत निंदनीय, लाजिरवाणे आणि खेदजनक कृत्य केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सांगोल्याचे प्रतिनिधीत्वआबांनी गेली 55 वर्षे केले. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आबांकडे महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्वाच्या घरावर दगडफेकीचे कृत्य करणे म्हणजे हि गोष्ट महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे. खरे म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांचे तत्व आजही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्याला प्रेरणा देत आहेत. अशा मौल्यवान विचारांची ठेवणंदेणाऱ्या आबांच्या घरावर झालेलयभ्याड हल्ल्याचा रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी.
सुरेश खैरे
चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष
रायगड







