तिघर येथे तरुणावर हल्ला; 12 जणांवर गुन्हे दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत मधील जामखिंड तिघर येथे अनिल हरिश्‍चंद्र देशमुख यांच्यावर जमिनीच्या वादातून हल्ला झाला होता. गाडी अडवून लोखंडी हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जखमी तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात उशिरा झाली असून अनिल देशमुख यांच्या जीवे मारण्यासाठी बाहेरील गुंड प्रवृत्तीचे लोक आणण्यात आल्याचे उघड झाले असून हल्ला केल्यानंतर ते सर्व पाच जण एम-एच-43 पासिंगच्या होंडा सिटी गाडीमधून पळून जाण्यास यशस्वी ठरले आहेत.

पळसदरी ग्रामपंचायत मधील तिघर या गावातील एकाच कुटुंबातील लोकांचे वडिलोपार्जित जमिनीचे वाद गेली काही वर्षे सुरु आहेत. याच वादातून यापूर्वी तीन गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, तसेच अनिल हरिश्‍चंद्र देशमुख यांच्या घरी जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. 25 जून रोजी सकाळी अनिल हरिश्‍चंद देशमुख हे आपल्या एम-एच-46 बी-ई-5260 मधुन नांगुर्ले येथुन भिलवले मार्गे जात असताना त्यांची कार एम-एच-43 पासिंग असलेली पांढर्‍या रंगाची होंडा सिटीसमोर आडवी घालण्यात आली. त्या गाडीमधून पाच अनोळखी तरुण उतरले आणि त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर लोखंडी रॉड यांच्या सहाय्याने हल्ला चढविला तसेच त्यांचे चालक रोहित सागर मोहिते यांच्या डाव्या खांद्यावर देखील लोखंडी रॉडच्या सहाय्याने फटका मारून जखमी करण्यात आले आहे. त्यावेळी हल्ला करून जीवातून गेला असल्याचे समजून होंडा सिटीमधून आलेल्या पाच तरुणांनी तेथून पळ काढला.जखमी अवस्थेत अनिल देशमुख यांना कर्जत उप जिल्हा रुग्णालयात आणले आणि तेथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच गावात राहत असून त्यांचेमध्ये त्यांचे वडिलोपार्जित नांगुर्ले येथील जागेवरुन वाद असून त्या वादामुळे आरोपी यांनी यापूर्वी फिर्यादी यांचे घरी जावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी यांचे ओळखीचा आदित्य कदम यांना देखील आरोपी यांनी फिर्यादी यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारणार आहोत असे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या हल्ल्यानंतर कर्जत पोलीस ठाणे येथे जखमी अनिल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 180/2024 नुसार भादंवि कलम 307, 324, 120 ब, 506,143,147,148,149,सह मुंबई पोलीस कायदा अधिनियम 37(1) (3) 135 प्रमाणे आणि रायगड जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश यांचे एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व 12 आरोपी हे फरार आहेत.

अनिल हरिश्‍चंद्र देशमुख यांना जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न झाला आहे. त्याबद्दल त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून गजानन बाळाराम देशमुख, योगेश वसंत देशमुख, जयंद्र गजानन देशमुख, प्रशांत सूर्यकांत देशमुख, विवेक विश्‍वनाथ देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख सर्व राहणार तिघर तसेच होंडा सिटीमधून आलेले पाच अनोळखी गुंड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या हल्ल्याप्रकारणी कर्जत पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Exit mobile version