। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
दापोली तालुक्यातील मुर्डी येथे गुरांच्या वादातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 09) दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. एकनाथ जगन्नाथ राऊत (39) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी विश्वास रामचंद्र महाडिक (रा. आंजले कातळकोंड, दापोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दापोलीमधील मुर्डी तेलेवाडी येथील एकनाथ राऊत हे बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मुर्डी येथील नवखंडा शेतात आपली गुरे चरवत होते. त्यावेळी त्यांनी गुरे हाकलण्यासाठी हातात असलेली काठी हलवली. याच गोष्टीचा गैरसमज करून घेत आरोपी विश्वास महाडिक याने एकनाथ राऊत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काहीवेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि विश्वास महाडिकने राऊत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एकनाथ राऊत गंभीर जखमी झाले. राऊत यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.