चाकूचा धाक दाखवून लूट

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

मदतीच्या नावाखाली फसवणूक आणि लुटमारीच्या घटना वाढत असताना पनवेलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मदत मागण्याचा बहाणा करून एका तरुणाला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करत लूट करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतम हाके (रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) हे 8 एप्रिल रोजी कळंबोली येथील गेट क्रमांक 5 जवळ रेल्वे पटरीच्या परिसरात बसले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. काही वेळाने त्यापैकी एकाने घाईघाईत मदत मागत, “माझा भाऊ चक्कर येऊन पडला आहे,” असे सांगितले. गौतम यांनी मदतीसाठी त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो त्यांना जवळच असलेल्या झाडाजवळ घेऊन गेला, जिथे दुसरा साथीदार आधीच थांबलेला होता. त्या ठिकाणी पोहोचताच दोघांनी मिळून गौतम यांना पकडले आणि त्यांच्या खिशातील सुमारे 2,400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. गौतम यांनी विरोध करताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या हातावर व छातीवर वार केले. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून मदत मागितली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गौतम यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Exit mobile version