उरणमध्ये मुले पळविण्याचा प्रयत्न

उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

। उरण । वार्ताहर ।

चिरनेर गावातील रहिवासी महादेव चंद्रकांत डोईफोडे यांच्या कन्येला पळवून नेण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि.11) अज्ञात इसमाने केला होता. परंतु, आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे मुले पळविण्याचा प्रयत्न करणार्‍या इसमाचा तो प्रयत्न असफल झाला आहे. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उरण पोलीस मुले पळविणार्‍या इसमाचा शोध घेत आहेत.

चिरनेर गावातील रहिवासी असणारे महादेव चंद्रकांत डोईफोडे हे आपल्या दोन मुलांसह गावातील रस्त्यावर फेरफटका मारायला गेले होते. काही वेळाने ते आपल्या घरी परत येत होते. त्यांचा मोठा मुलगा हा घेरी गेला तर वडिलांच्या मागून त्यांची 9 वर्षांची देवश्री ही कन्या चालत येत होती. महादेव डोईफोडे हे घराजवळ गेले असता त्यांची कन्या मागून येताना दिसली नाही. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कन्येच्या पायातील बूट रस्त्यावर पडलेले निदर्शनास आले. त्याच दरम्यान भयभीत अवस्थेत देवश्री ही कन्या येताना दिसली. यावेळी सदर कन्येने झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

या घटनेची माहिती शेजार्‍यांना कळताच शेजार्‍यांनी मुले पळविण्याचा प्रयत्न करणार्‍या इसमाचा शोध सुरू केला. त्याच रस्त्यावरुन येणार्‍या भरत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, एक इसम लहान मुलीला उचलून तिचे तोंड दाबून घेऊन जात होता. आम्हाला वाटल की, तो त्या मुलीचा बाप असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. मात्र मुलीने काका मला वाचवा अशी ओरड केली. मी त्याला सोड असा आवाज दिला. त्याच दरम्यान मुलीने त्या इसमाच्या हातावर जोरदार चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढला. आम्हाला कल्पना नसल्याने आम्ही मुलीच्या मागे धावत आलो. एकंदरी मुलीच्या धाडसामुळे व भरत जाधव या आदिवासी बांधवांमुळे मुलगी सुखरूप आपल्या आई वडिलांना पुन्हा सापडली आहे. या झालेल्या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच उरण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मुले पळविणारा इसम हा आपल्या चारचाकी वाहनासह सीसीटीव्हीत कैद झाल्याने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी उगले व त्यांचे सहकारी मुले पळविणार्‍या इसमाच्या टोळीचा शोध घेत आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version