जातीवाचक शिवीगाळ; पाली पोलिसांत तक्रार
| कोलाड | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पेडली येथील रहिवासी राम पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या घरावरील जुने वीजमीटर कोणतीही पूर्वसूचना न देता काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता, संबंधित अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
राम पवार यांच्या म्हणण्यानुसार, 27 मे रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत घरावरील जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले. याबाबत विचारणा करण्यासाठी ते व त्यांचे पुत्र तथा तिवरे ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश पवार संबंधित कर्मचाऱ्यांना भेटले असता, उपअभियंता चात्रे आणि सहाय्यक अभियंता भंडारी यांनी त्यांच्याशी उर्मट वर्तन करत जातीवाचक अपमानास्पद वक्तव्ये केली. तसेच राम पवार यांना जबरदस्तीने वाहनात बसवून अन्य ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय जनजातीय आयोग तसेच विविध आदिवासी संघटनांनाही देण्यात आले आहे.
पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांनी चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
राज्य सरकारने ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई न झाल्यास रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
भिवा पवार,
जिल्हाध्यक्ष,
एकलव्य आदिवासी संघटना
