कामार्ली येथील घटना; एका आरोपी अटकेत तर दुसरा फरार
। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील कामार्ली येथील बँक ऑफ इंडिया बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पेण तालुक्यातील कामार्ली गावात बँक ऑफ इंडियाचा एटीएम जिलेटिन च्या साह्याने फोडून दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी पहाटे ३:०० ते ३:३० च्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील रहिवाशी संतोष कांबळे (वय 34 ) हा आरोपी व त्याचा साथीदार कामार्ली येथील एटीएम वर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते. कामार्ली येथील ग्रामस्थांनी एटीएम जवळ संशयितरित्या कृत्य करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींना पाहिले.
त्याच वेळेला रात्रीच्या गस्तीवर असलेले पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांच्या सहकार्याने नागरिकांच्या मदतीने आरोपी संतोष कांबळे याला ताब्यात घेतले तर त्याचा दुसरा साथीदार मात्र यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तडवी हे करत आहेत.