सांडपाणी पाईपलाईन कापण्याचा प्रयत्न

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यातील लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाणी पाईपलाईन कोतवली येथील सोनपात्रा नदीजवळ तीक्ष्ण हत्याराने कापण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. 630 मिमी व्यासाची ही पाईपलाईन अज्ञातांना फोडता आलेली नसली तरी झालेल्या प्रयत्नाने पाईपलाईनला गळती लागून ते पाणी खाडीत गेले आहे. हा प्रकार गांभीर्याने घेत सीईटीपीसह एमआयडीसीने याप्रकरणी लोटे दुरक्षेत्रासह खेड पोलिस स्थानकात तक्रार अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन त्यावर प्रक्रीया केली जाते. प्रक्रीयेनंतर ते सांडपाणी 630 मिमि व्यासाच्या एचडीपीई पाईपलाईनमधून लोटे ते करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात किमीची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. या पाईपलाईनला अधूनमधून गळती लागते. गळतीनंतर त्याची एमआयडीसीकडून दुरुस्ती केली जाते. चार दिवसांपूर्वी कोतवलीत प्रदूषणाने मासे मृत झाल्याची तक्रार केली गेली होती. अशातच पाईपलाईनची देखभाल करणारे विजय जुवळे यांना हे गस्त घालत असताना रेल्वे पुलाजवळ अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण अवजाराच्या साहाय्याने पाईपलाईन कापण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले होते.

Exit mobile version