प्रशासकाने प्रत्येक कामगाराच्या समस्या घेतल्या जाणून
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळसारख्या शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतीमधील समस्या स्थानिकांच्या नित्याच्या बनल्या आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामस्थांच्या समस्या कमी करण्यासाठी शासनाने नेमलेले प्रशासक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासक सुजित धनगर यांनी नेरळ ग्रामपंचायतमधील सर्व कर्मचार्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामांवर भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीची मुदत 5 डिसेंबर रोजी संपत आहे, मात्र ग्रामपंचायतीच्या 16 पैकी 15 सदस्यांनी राजीनामे दिल्याने नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुजित धनगर यांच्याकडे नेरळ ग्रामपंचायतीची सूत्रे देण्यात आली आहेत. गेली काही महिने नेरळ ग्रामपंचायतमधील कारभाराबद्दल आणि गावातील समस्यांबद्दल ग्रामस्थ असमाधानी आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे हेतूने प्रशासक सुजित धनगर यांनी कामकाज सुरू केले आहे. नेरळ गावातील प्रत्येक ग्रामस्थाला भेट मिळेल असे वेळापत्रक कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे.
मात्र ग्रामपंचायतीमधील कर्मचार्याच्या वर्तणुकीचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनातील प्रत्येक कामगाराची भेट घेत त्यांच्या समस्या आणि त्यांच्याकडून कामाची अपेक्षा धनगर यांनी निश्चित केली आहे. तरीदेखील ग्रामपंचायतीचे कर्मचारी खरोखर नेमून दिलेलं काम करतात का? हे पाहण्यासाठी आणि कर्मचारी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासक सुजित धनगर हे सकाळी सहा वाजता नेरळ गावात पोहचले. या कालावधीत नेरळ ग्रामस्थ यांच्यासाठी पाणी पुरवठा वितरण सुरू असते आणि गावातील बाजारपेठ भागातील कचरा उचलण्याचे आणि रस्ते स्वच्छ करण्याची कामे सुरू असतात. त्यामुळे सहा वाजता जलशुद्धीकरण केंद्र आणि नंतर वितरण जलकुंभ येथे जावून पाणी सोडण्याची कार्यवाही समजून घेतली. त्यानंतर कचरा उचलला जात असलेल्या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत भेट देत कर्मचार्यांना सूचना देण्याचे काम सुजित धनगर यांनी दिले.
रामदास कोकरे यांची आठवण
कर्जत शहरात मुख्याधिकारी पदावर काम करताना स्वच्छतेला महत्त्व देणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे हे पहाटे सहा वाजता वेगवेगळ्या भागात सायकलवरून फेरफटका मारायचे. त्यामुळे नेरळ गावात प्रशासकीय राजवट आल्यानंतर नेरळ ग्रामस्थांना शासनाने नेमलेल्या प्रशासकदेखील सकाळी गावात फेरफटका मारत असल्याचे पाहून मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची आठवण झाली.







