नेरळ-कळंब रस्त्याचे काम करताना डेब्रिज वाहत्या पाण्यात टाकण्याचा प्रयत्न

उल्हास नदी संवर्धन समिती आक्रमक
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदीचे पाणी ठाणे जिल्ह्यातील शहरांना पिण्याचे पाणी पुरविणारी उल्हास नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात आहे. त्यात या नदीवरील दहिवली मालेगाव पुलावरील डांबराचे डेब्रिज पुलावरून नदीच्या पात्रात टाकण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल उल्हासनदी संवर्धन समितीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदाराच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्षे खराब असलेल्या नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु आहे. रविवारी (दि. 19) ठेकेदाराने दहिवली मालेगाव पुलावरील डांबराचा खराब भाग जेसिबी मशीनच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन बांधकाम खात्याने नेमलेल्या ठेकेदाराने आपले त्रास कमी करण्यासाठी पुलावरील डांबराचे डेब्रिज थेट नदीच्या पात्रात टाकण्यास सुरुवात केली.


दरम्यान उल्हासनदी संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांना मालेगाव दहिवली पुलावर डांबराचे डेब्रिज वाहत्या पाण्यात टाकले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्या सर्वांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदाराला जाब विचारला. त्यावेळी पुलाच्या अर्ध्या भागातील डेब्रिज हे पाण्यात टाकण्यात आले होते. जेसीबी मशीनने खरवडून काढलेले डेब्रिज त्या मशीनच्या साहाय्याने गोळा करून थेट नदीच्या पात्रात टाकले जात होते. याबाबतची माहिती कानोकानी पडताच समितीचे कार्यकर्ते केशव तरे यांनी या सर्व प्रकारचा फेसबुक लाईव्ह करीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना फोन करून माहिती दिली. त्यावेळी त्यांच्याकडून देखील असा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून ठेकेदार कंपनीला पाणी दूषित झाल्यास ठेकेदाराला जबाबदार धरणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version