महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

| पेण | प्रतिनिधी |

दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्याचा प्रयत्न तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि.5) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास श्रीरामनगर, फणसडोंगरी, पेण येथे घडली.

तक्रारदार महिला घरी असताना तिचा ओळखीचा मित्र आरोपी हा दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन घरात घुसला. त्याने महिलेला तिच्या हालचालींबाबत जाब विचारत शिवीगाळ केली. कोयता घेऊन मारण्यासाठी अंगावर येत असताना महिलेने विरोध केला. त्यानंतर आरोपीने दगड फेकून मारल्याने तो महिलेच्या कानाजवळ लागून दुखापत झाली. यानंतर आरोपीने हातातील कोयत्याने महिलेच्या मुलाच्या मोटारसायकलवर वार करून तिचे नुकसान केले. तसेच महिलेच्या मुलीबाबत विचारणा करत शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवरखेडे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version