गेलच्या परप्रांतीय कामगाराकडून मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

आरोपीला गावकर्‍यांनी चोपले; चिंचोटी हद्दीत घटना

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

चिंचोटी गावच्या रस्त्यावर एका अल्पवयीन मुलीवर गेल कंपनी कामावर असलेल्या परप्रांतीय तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. सुदैवाने वेळीच तिने आरडाओरडा केला आणि गावकरी घटनास्थळी पोहचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. संतप्त गावकर्‍यांनी त्यातील एका आरोपीला चांगलाच चोप दिला. या घटनेची नोंद रेवदंडा पोलिसांनी घेतली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वावे येथून एक अल्पवयीन मुलगी चिंचोटी येथील आपल्या गावी चालत जात होती. ती ज्या रस्त्याने जात होती, त्या मार्गावर निर्जन ठिकाणी आरोपींनी तीला रस्त्याच्या बाजूला शेतात ओढत नेले. आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला म्हणून ओढणीने तिचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने या मार्गावरून एक वाहन गेले. त्याच्या प्रकाशाने घाबरून दोघे पळाले. त्या मुलीने आरडाओरडा केल्याने काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या आरोपीला पकडले. हा तरुण खाजगी कंपनीत कंत्राटी ठेकेदाराकडे काम करीत असल्याचे सांगण्यात येते. गावातील मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या तरुणाला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला.

या घटनेमुळे चिंचोटी आणि पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव प्रचंड संतापला होता. गेलं कंपनीच्या ज्या कंत्राटी ठेकेदाराकडे परप्रांतीय असलेला आरोपी काम करतो. या ठेकेदाराला बोलवा, त्या शिवाय आरोपीला घेऊन जाऊ नये असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला. वातावरण चांगलेच तापले होते. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. रेवदंडा पोलीस ही घटनास्थळी पोहचले होते. त्यानी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

लाठीचार्जवर गावकरी नाराज
घटनेची खबर सर्वत्र पसरली आणि गावकरी घटनास्थळी धावले. वातावरण चांगलेच तापले होते. गावकरी ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. त्या परप्रांतीय तरुणाच्या ठेकेदार मालकाला बोलवा, ही एकच मागणी होती. या वेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे गावकर्‍यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या लाठीचार्ज मध्ये पीडित मुलीच्या वडिलांना देखील मार बसला. या लाठीचार्जवर गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. चिंचोटी येथील ही घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. आणि पहाटे साडे चार च्या सुमारस आरोपिवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येते. रात्रभर या घटनेमुळे रेवदंडा पोलीस ठाण्यात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परप्रांतीयांची वाढती संख्या
नोकरी आणि कामासाठी पर जिल्ह्यातील लोक अलिबाग तालुक्यातील गावागावात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कंत्राटी पध्दतीवर मिळेल ते काम ते करतात. एकतर कामाच्या ठिकाणी झोपडी बांधून रहातात, नाहीतर गावात भाड्याच्या खोलीत रहातात. विशेष म्हणजे, त्यांच्या ओळखीचे किती दाखले घरमालक तपासून घेतात? हा प्रश्‍न आहे. ठेकेदार देखील त्यांची शहानिशा करतात का? अशा मजुरांची माहिती ते गावातील ग्रामपंचायत, पोलीस पाटील, पोलीस ठाणे येथे देतात का? या सर्वांची चौकशी व्हावी, अशी बाब या घटनेच्या अनुषंगाने पुढे आली आहे.

Exit mobile version