रेवदंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई; स्थानिकांमध्ये संतापाची लाट
| अलिबाग | प्रतिनिधी |
घरात घूसून एका विवाहित महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. गेल कंपनीत कामाला असणाऱ्या परराज्यातील कामगाराने हा प्रकार केला आहे. तिचा गळा दाबण्यात आला होता. ही घटना गुरुवारी (दि.24) दुपारी घडली. हल्लेखोराविरोधात रेवदंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या दणक्याने रेवदंडा पोलीस तातडीने कामाला लागले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारसकुमार असे या हल्लेखोराचे नाव आहे. हा मुळचा बिहार राज्यातील आहे. सध्या मुळखानाव येथे भाड्याने राहत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो गेल कंपनीत कामगार म्हणून काम करीत आहे. पिडीत महिला गुरुवारी (दि.24) दुपारी तिच्या घरात होती. या संधीचा फायदा घेत आरोपी पारसकुमार घरात घुसला. मागून तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बचावासाठी आरडाओरड केली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला सुखरूप सोडवले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात पीडित महिला तक्रार दाखल करण्यास गेली. मात्र तेथील पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केली. पाच ते सहा तास होऊनदेखील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने स्थानिकांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती.
या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना मिळाली. त्यांनी रेवदंडा पोलिसांशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केली. दलाल यांच्या दणक्याने रेवदंडा पोलिसांच्या कारवाईची हालचाल वेगात सुरू झाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुखापत करण्याबरोबरच महिलेच्या अंगावरील दागीने चोरण्याच्या इराद्याने आरोपी घरात घुसून पाठीमागून महिलेची मान पकडल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली असून आरोपी हा गेल कंपनीत गेल्या तीन महिन्यांपासून कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ करीत आहेत.







