विश्‍वासार्ह माहितीमुळे माहिती व जनसंपर्कच्या बातमीची दखल: विवेक गिरधारी

नवी मुंबई | वार्ताहर |
माहिती व जनसंपर्क विभागाची बातमी विश्‍वासार्ह असते, यासाठी माध्यमांकडून त्या बातमीची दखल घेतली जाते, असे मत ज्येष्ठ पत्रकार विवेक गिरधारी यांनी व्यक्त केले.
कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत आयोजित ‘शासकीय बातमी लेखन : वास्तव आणि अपेक्षा’ या विषयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क विभागाच्या कोकण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव, पालघरचे प्र. जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, सहायक संचालक नंदकुमार वाघमारे यांच्यासह विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गिरधारी म्हणाले की, उत्तम दर्जाच्या चांगल्या पुस्तकांचे, लेखकांचे वाचन केल्याने बातमीची गुणवत्ता आणि भाषेचा दर्जा उंचावतो. अचूक, स्वच्छ आणि शुध्द बातमी लेखनासाठी दैनंदिन वाचन आवश्यक आहे. शासकीय अधिकारी/कर्मचार्‍यांनी बातमी तयार करताना बातमीचा आनंद घेतला पाहिजे. बातमीची गुणवत्ता वाढविण्यासाठी शब्दसंग्रह आवश्यक आहे. त्यातून आपल्या बातमीची गुणवत्ता वाढते, असेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाच्या दुसर्‍या सत्रात ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी शासकीय अधिकारी/कर्मचार्‍यांच्या दृष्टिकोनातून बातम्या कशा लिहाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. वृत्तपत्रांसाठी नेमकी कशी बातमी हवी. आपण जे काम करतो ते अधिक चांगल्या पद्धतीने कसे होईल, याबद्दल त्यांनी माहिती दिली. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती सहायक प्रवीण डोंगरदिवे यांनी केले.

Exit mobile version