शिक्षणाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे लक्ष

आरसीएफ शाळेसाठी पालकांसह विद्यार्थीदेखील सरसावले

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कुरुळ येथील आरसीएफ शाळेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी सोमवारी शाळेत जाऊन पालक व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शाळा सुरु ठेवण्याबाबतच्या पालक व विद्यार्थ्यांच्या भूमिकेला दुजोरा देत शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरसीएफ शाळेच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी शिक्षणाधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित आरसीएफ शाळा सुरु आहे. शाळेबरोबरच महाविद्यालयदेखील या ठिकाणी आहे. अलिबागसह परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी या शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या शाळा, महाविद्यालयात एक हजार 300हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना साठहून अधिक शिक्षक घडविण्याचे काम करीत आहेत.

मात्र, अचानक ही शाळा चालविण्यास समर्थ नसल्याचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आरसीएफ कंपनीला पत्र दिले असल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. शाळा बंद होणार असल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरताच पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही शाळा सुरु ठेवण्याबाबत पालकांची मागणी जोर धरू लागली. वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून शाळेचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील यश आले नाही. अखेर हा प्रश्‍न जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे गेला.

शाळेच्या प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी यासाठी गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शाळेच्या वर्गात सुनावणी घेण्यात आली. या बैठकीला आरसीएफ कंपनीचे अधिकारी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, पालक, विद्यार्थी, शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी केंद्रप्रमुख सुबोध पाटील, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संविधा जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. मात्र, कंपनीसह एज्युकेशन सोसायटीचे कोणीही या बैठकीला हजर झाले नाही.

यावेळी गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी विद्यार्थ्यांसह पालकांचे मत ऐकून घेतले. त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा सुरु राहण्याबाबत पालकांचे, विद्यार्थ्यांचे सकारात्मक मत घेऊन त्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना पाठविला जाणार असल्याचे पिंगळा यांनी सांगितले. त्यामुळे आरसीएफ शाळेचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षणाधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आरसीएफ शाळेच्या प्रश्‍नाबाबत माहिती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. कंपनीसह डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील अधिकारी व पदाधिकार्‍यांना पाचारण केले होते. मात्र, ही मंडळी हजर राहिली नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे मत लिहून घेतले. त्याचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. शाळा सुरु राहिली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.

कृष्णा पिंगळा,
गटशिक्षणाधिकारी

पहिलीपासून या शाळेमध्ये मी शिक्षण घेत आहे. सध्या इयत्ता बारावीच्या वर्गात आहे. या शाळेत चांगले शिक्षण मिळत आहे. मुलांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतावाढीसाठी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ही शाळा सुरुच राहिली पाहिजे.

सर्वेश कानप,
विद्यार्थी
Exit mobile version