कल्याणमध्ये नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

| ठाणे | वृत्तसंस्था |

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप-शिवसेना शिंदे गटातून दावे-प्रतिदावे सुरू होते. अखेर कल्याण मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन शिंदे यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते ही कोंडी कशी फोडतात, याकडे लक्ष लागले आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी तीन-चार वेळा कल्याण मतदारसंघाचा दौरा केला. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाजप निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली होती. ठाणे, कल्याणच्या जागेवर भाजपने दावा केला. मंत्री रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे मित्रपक्षांतील वाद शिगेला पोहोचला होता. आ. गायकवाड हे शिवसेना पदाधिकार्‍यांवर गोळीबार केल्याने तुरुंगात आहेत. त्यांच्या समर्थकांनी नुकतीच बैठक घेत डॉ. शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्यांनीही डॉ. शिंदे यांचा अपप्रचार करून गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल, अशा भ्रमात त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी राहू नये, असा इशारा दिला. भाजपने युतीत खोडा घालणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. त्यामुळे भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Exit mobile version